Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts
Showing posts with label सुधीर मोघे. Show all posts

घर दोघांचे, घरकुल पाखरांचे

घर दोघांचे, घरकुल पाखरांचे

वाटा कशा निराळ्या जणू एकरूप झाल्या
एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या
जुळले अतुट नाते दोन्ही मनामनांचे

कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही
रुजले कधी न बीज दोघांत संशयाचे

विश्वास ठेविला मी, विश्वास तू दिलास
जपलेस तू मला अन्‌ मीही तुझ्या मनास
एका क्षणात अपुल्या सुख साधले युगांचे

गीत – सुधीर मोघे

संगीत – सुधीर फडके

स्वर- अनुराधा पौडवाल

चित्रपट – चोराच्या मनांत चांदणे

गीत प्रकार – चित्रगीत

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो, तो खरंच, आधार असतो का?

गर्द अंधारातुन आपण प्रकाशात येताना, एकटेच असतो !
पुन्हा काळोखात विरताना सुद्धा, हा एकटेपणाच आपली सोबत करतो !

मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का?
जिच्यामुळे असहाय्य व्हावं, एवढी तिची मिजास का?

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?

ज्यांचा आधार शोधायचा, ते तरी कुठे समर्थ असतात !
खरं म्हणजे, ते देखील आपल्यासारखे, उजेडात चाचपडत असतात !!

तरीही त्यांच्या हाताची ऊब आपणाला का हवी असते?
गंमत म्हणजे, आपल्या खांद्यावरही कुणाची मान विसावू पहाते !

अखेर ‘आधार’ या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?
जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का?

गीत – सुधीर मोघे

संगीत – बाळ बर्वे

स्वर- चंद्रशेखर गाडगीळ

गीत प्रकार – भावगीत

  टीप – • दूरदर्शन कार्यक्रम ‘शब्दांच्या पलीकडले’साठी.

झुलतो बाई रास-झुला

झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणु, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा

प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा

गुंतलास कोठे नंदनंदना तू
राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला

गीत – सुधीर मोघे

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – जानकी

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर

कधी गौर बसंती

कधी गौर बसंती
कधी सावळी छाया
कधी वेल कृशांगी
कधी पुष्कळा काया
दर वळणावरती अनोळखी झालीस
मी ओळखिले तू.. होय, तूच आलीस

ना सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद

गीत – सुधीर मोघे

संगीत – मंगेश गोसावी

स्वर- हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी-रानडे

अल्बम – लय

गीत प्रकार – भावगीत, युगुलगीत

गहन अमेच्या गर्भातुनही

गहन अमेच्या गर्भातुनही चाहुल कोमल पुनवप्रभेची
कडा रुपेरी काळोखाची

नभ गिळलेले अंधाराने
विश्व आंधळे केविलवाणे
तरीही त्याला एकच आशा, धूसर लवलवत्या क्षितिजाची

शिशिराचे साम्राज्य पसरले
हिरवेपण पुरते वठलेले
तरीही त्या वैराणी घुमते लकेर नाजुक तृणांकुराची

दु:खांना सौख्याची झालर
सुखावरी दु:खांची पाखर
उमगून घे हे खंत नको मग, घडलेल्याची ना घडल्याची

गीत – सुधीर मोघे

संगीत – सुधीर मोघे

स्वर- मुकुंद फणसळकर

नाटक – कडा रुपेरी काळोखाची

गीत प्रकार – नाट्यसंगीत

क्षणोक्षणीं

क्षणोक्षणीं रात्रंदिन
तुला आठवीन

आकारात ॐकारात
सगुणात निर्गुणात
तुलाच पाहीन

सुषुप्तीत जागृतीत
काळजाच्या स्‍पंदनात
तुलाच गाईन

भेट होता उराउरी
प्राण तुझ्या पायांवरी
वाहीन वाहीन

गीत – सुधीर मोघे

संगीत – बाळ बर्वे

स्वर- चंद्रशेखर गाडगीळ

गीत प्रकार – भक्तीगीत

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार

सूर स्पर्श सूर श्रवण
स्वरगंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार

सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार

सप्तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार

गीत – सुधीर मोघे

संगीत – सलील कुलकर्णी

स्वर- सलील कुलकर्णी

गीत प्रकार – प्रार्थना

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश

रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी
संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

गीत – सुधीर मोघे

संगीत – श्रीधर फडके

स्वर- आशा भोसले, सुधीर फडके

चित्रपट – लक्ष्मीची पाऊले

राग – मिश्र भैरवी

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत

सखि मंद झाल्या तारका आता तरी य

सखि मंद झाल्या तारका
आता तरी येशील का?

मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशील का?

हृदयात आहे प्रीत अन्‌
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा,
सूर तू होशील का?

जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का?

बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का?

गीत – सुधीर मोघे

संगीत – राम फाटक

स्वराविष्कार- ∙ सुधीर फडके∙ पं. भीमसेन जोशी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – भावगीत

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाल

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो

वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो

अव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे
काटेकुटे विखारी वेचित चाललो

दाही दिशांत वेडा वैशाख मातला
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो

ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो

गीत – सुधीर मोघे

संगीत – राम फाटक

स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी

गीत प्रकार – भावगीत

ही तपस्या ना स्वर्गाची

ही तपस्या ना स्वर्गाची, मोक्षाची
ही तपस्या ना लोभाची, लाभाची
ही तपस्या नाही पुढल्या जन्‍माची
ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची
ही तपस्या तरीही केवळ भाग्याची
ही तपस्या तशी श्रमांची, कष्टांची
ही तपस्या एकलकोंड्या वाटेची
ही तपस्या नवस्वप्‍नांच्या रचनेची
ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची
ही तपस्या तुमची-माझी, सर्वांची
ही तपस्या माणुसकीच्या धर्माची

गीत – सुधीर मोघे

संगीत – चैतन्‍य कुंटे

स्वर- राहुल देशपांडे

गीत प्रकार – मालिका गीते

  टीप – • शीर्षक गीत, मालिका- तपस्या, वाहिनी- सह्याद्री.

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाल

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली

एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

गीत – सुधीर मोघे

संगीत – सुधीर मोघे

स्वर- उत्तरा केळकर, सुरेश वाडकर

चित्रपट – कशासाठी? प्रेमासाठी!

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत

दयाघना

दयाघना
का तुटले चिमणे घरटे?
उरलो बंदी असा मी

अरे जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास
आता बंदी तुझा मी
दयाघना

दहा दिशांची कोठडी
मोह-माया झाली बेडी
प्राण माझे ओढी
झालो बंदी असा मी
दयाघना

बालपण उतू गेले
अन्‌ तारुण्य नासले
वार्धक्य साचले
उरलो बंदी पुन्हा मी
दयाघना

गीत – सुधीर मोघे

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- सुरेश वाडकर

चित्रपट – संसार

राग – पूर्वा

गीत प्रकार – चित्रगीत

एक झोका, चुके काळजाचा ठोका,

एक झोका,
चुके काळजाचा ठोका,
एक झोका

उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका

नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे
खूप मजा, थोडा धोका

गीत – सुधीर मोघे

संगीत – आनंद मोडक

स्वर- आशा भोसले

चित्रपट – चौकट राजा

गीत प्रकार – चित्रगीत

घडून जे गेले ते, घडेल का फिरुन

घडून जे गेले ते, घडेल का फिरुनि ते?
कसे पुन्हा उमलावे सुकलेले नाते?

कशा जुळाव्या रेशमी गाठी?
कशा मिळाव्या चांदण्या राती?
दुरावले सुख जे ते फिरून का भेटे?

क्षणी रुसणे क्षणी झुरणे, क्षणामधे हसणे
मनोगतांचे बोलके गाणे
न बोलता हृदयीचे स्वराविना गाते

गीत – सुधीर मोघे

संगीत – प्रभाकर जोग

स्वर- अनुराधा पौडवाल

चित्रपट – चांदणे शिंपीत जाशी

गीत प्रकार – चित्रगीत