Showing posts with label वसंत बापट. Show all posts
Showing posts with label वसंत बापट. Show all posts

जगि घुमवा रे, दुमदुमवा रे भारत

जगि घुमवा रे, दुमदुमवा रे भारत-गौरव-गान
या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान
उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल अमुचा देश महान
अमुचा देश महान्‌

काश्‍मीरापासून विहंगम सिंधुसंगमा जावा
नेत्रांवरती शत चित्रांचा सुंदर साज सजावा
कधि पर्वतराजी विशाला
कधि अफाट हिरवी राने
कधि झुळझुळत्या गिरिबाला
कधि रेतीची मैदाने
गंगेपासून तुंगेपावत अखंड हे वरदान
अमुचा देश महान

किति शेतकरी
खळ्यात मळ्यात दिसती

कुणि कष्टकरी
डोंगरदरीत वसती

किति कामकरी
घामात भिजून हसती

कुणि दर्यावरी
पाण्याची शेती कसती

अगणित जनगण बहुभाषी अन्‌ बहुधर्मी बहुवेषी
एकमनाने प्रेमभराने नांदति भारत देशी
निजकलह विसरले सारा
हृदयाचे जुळले बंध
झंकारत आल्या तारा
गीताला प्रीतिसुगंध
कंपित मंथर अंतर गाते प्रेमाचे मधुगान
अमुचा देश महान

जशी साळी झुले
आसामच्या शेतात राया

तशी होडी डुले
केरळच्या पाण्यात राया

जशी येती फुले
झेलमच्या बनात राया

तशी होरी खुले
गोरीच्या मनात राया

अधीर पदांनी रुधिर धावते एकच ताल तयाला
कोटिकोटि कंठातुन आली लहरत ही स्वरमाला
गगनात दुंदुभी वाजे
थरथरली वसुधामाई
दशदिशा प्रकाशित झाल्या
लहरींतुन सागर गाई
जय जय भारत, जन ललकारत उधळुन पंचप्राण
अमुचा देश महान

गीत – वसंत बापट

संगीत – कनू घोष

स्वर- आकाशवाणी गायकवृंद

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

खबरदार, खबरदार !

खबरदार, खबरदार !
जागा जनसागर हो,
खबरदार !

घोषवीत निज विजया
सूर्यबिंब ये उदया
दश दिशा, नव उषा, गगनि रंगल्या कशा
किरणबाण प्राण हरी
अंधकार मरण वरी
लहर लहर अरुणरंग मंगलध्वजा धरी
खबरदार !

मुक्तिमंत्र हृदयि उठे
अंध-रूढि-बंध तुटे
उसळते, उकळते, तरुण रुधिर पेटते
जनमनात आग जळे
दुराचार दूर पळे
प्रलयविलयि हो युगान्‍त, नूतन प्रभात ये
खबरदार !

गीत – वसंत बापट

संगीत – कनू घोष

स्वर- आकाशवाणी गायकवृंद

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋच

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत

मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत

गीत – वसंत बापट

संगीत – यशवंत देव

स्वर- उषा मंगेशकर

गीत प्रकार – प्रथम तुला वंदितो, भक्तीगीत

सखी एकलेपणाचा चल संपवू सहारा उ

सखी एकलेपणाचा चल संपवू सहारा
उत्फुल्ल यौवनाचा फुलबाग ये बहारा

हातात हात घेता फुलती गुलाब गाली
देती लबाड डोळे शब्दाविना इशारा

मुखचंद्र हासता भरती मनास येते
सांगे रहस्य सारे अंगावरी शहारा

गीत – वसंत बापट

संगीत – श्रीनिवास खळे

स्वर- विश्वनाथ बागुल

नाटक – पाणिग्रहण

गीत प्रकार – नाट्यसंगीत

वाजे विजय तुतारी रे,

वाजे विजय तुतारी रे, तोरण बांधा दारी रे
रजत जयंती स्वातंत्र्याची दुमदुमते ललकारी रे
चला रे घुमवा जयजयकार, जय जय भारतमाता

खडतर होती पहिली वाट
आता सरले अवघड घाट
या विजयाच्या शिखरावरती झेंडा उंच उभारी रे

भूमीमध्ये जिरला घाम
कामकर्‍यांचे फळले काम
हिरवी राने हिरवी पाने, हिरवी भूमी सारी रे

हिंमत हरली दैन्याची
फत्ते झाली सैन्याची
भारतमाता आहे आता भाग्याची अधिकारी रे

नवतरुणांनो सरसावा
जपा जपा रे हा ठेवा
नव्या नव्या नित आकाशांतुन मारा गरुडभरारी रे

गीत – वसंत बापट

संगीत –

स्वर-

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

  

भव्य हिमालय तुमचा अमुचा

भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्‍न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक्‌ तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनी जनार्दन बघणारा तो ‘एका’ हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करु देत भले
माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तिची पेठ खुले

कळे मला काळाचे पाउल द्रुत वेगाने पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहू पसरुन अवघ्या विश्वाते कवळी
माझ्या घरची विशाल दारे खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयात
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात

गीत – वसंत बापट

संगीत – शांक-नील

स्वर- श्यामा चित्तार, शरद जांभेकर

गीत प्रकार – कविता, स्फूर्ती गीत

चल सर्जा, चल राजा

चल सर्जा, चल राजा, बिगी बिगी बिगी जायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं

माथ्यावरती दिवसाचा ये डोळा, चल सर्जा
होय भुकेला शंभू हा हाय भोळा, चल राजा
भाकर कांदा, झुणका रांधा, पोट भरे रायाचं

उडेल फेटा पळसाच्या रंगाचा, चल सर्जा
खण जरतारी आणिन मी भिंगाचा, चल राजा
तुजवर माळा, घुंगुरवाळा, लेणं सौभाग्याचं

येईल आता चांदोबा आभाळी, चल सर्जा
होइल वेडी पारंब्यांची जाळी, चल राजा
कलत्या माना, डुलक्या घ्या ना, टकमक नच पाह्याचं

गीत – वसंत बापट

संगीत – जितेंद्र कुलकर्णी

स्वर- सचिन पिळगांवकर

गीत प्रकार – लोकगीत

एक दिलाने एक मुखाने

एक दिलाने एक मुखाने दुमदुमवा संदेश
गोवा-कोकण-वर्‍हाड-दख्‍खन एक मराठा देश

एकच आहे शांतादुर्गा-तुळजा-मायभवानी
एकच ही कोकणी-पुणेरी-नागपुरी-अहिराणी
एक असे हा भीमाशंकर-महादेव-मंगेश

मंगेशाला नवस बोलती देशावरल्या माता
गोमंताचे हृदय हालते नाव विठूचे गाता
म्हणा तुकोबा म्हणा सोयरा, एक हृदय दो वेष

शेतमळ्यांची कुळागरांची एकच आहे आशा
हिंदु म्हणा वा म्हणा इसाई, ही वरवरची भाषा
धमनीमधले रक्त एक हे, एक असे हृदयेश

गीत – वसंत बापट

संगीत – जितेंद्र कुलकर्णी

स्वर- सचिन पिळगांवकर

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

  टीप – • या गीतात मा. दीनानाथ मंगेशकर आणि त्यांच्या कन्या (लता, आशा, उषा, मीना) यांचा संदर्भ चवथ्या कडव्यात वापरला आहे.

गगनसदन तेजोमय

गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन जनन-मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतून
प्रेमरूप भासतोस
कधी येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय

गीत – वसंत बापट

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – उंबरठा

राग – तिलककामोद

गीत प्रकार – चित्रगीत, प्रार्थना

घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी

घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी

वेळुच्या बनात चाले वार्‍याचे गायन
पाचोळ्याने भोवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणि

दूरावर ऐकु येई सागराचे गीत
निळेनिळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनीवाणी

वार्‍यामध्ये ऐकु येई तुझे कानगुज
चंद्रसूर्यतार्‍यांमाजी प्रभु तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी

गीत – वसंत बापट

संगीत – वसंत देसाई

स्वर- आशा भोसले

चित्रपट – श्यामची आई

गीत प्रकार – चित्रगीत