Showing posts with label ना. घ. देशपांडे. Show all posts
Showing posts with label ना. घ. देशपांडे. Show all posts

फार नको वाकू जरी उंच बांधा फार

फार नको वाकू
जरी उंच बांधा
फार नको झाकू
तुझा गौर खांदा

आणि गडे डोळे
तुझे फार फंदी
साज तुझा आहे
जुईचा सुगंधी

चित्त मऊ माझं
जशी रानकळी
धुंद तुझी आहे
नदी पावसाळी

श्वास तुझे माझे
जसा रानवारा
प्रीत तुझीमाझी
जसा सांजतारा

गीत – ना. घ. देशपांडे

संगीत – जी. एन्‌. जोशी

स्वर- जी. एन्‌. जोशी

गीत प्रकार – भावगीत

अंतरीच्या गूढ गर्भीं एकदा जें

अंतरीच्या गूढ गर्भीं एकदा जें वाटलें !
एकदा जें वाटलें तें प्रेम आता आटलें !

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मीं, तू :
रंगलें आभाळ पूर्वी : तेंच आता फाटलें !

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्‍नेहतंतू आंतले !

शेवटी मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणे
राहणें झालें दिवाणें, गीत गाणें कोठलें !

गीत – ना. घ. देशपांडे

संगीत – राम फाटक

स्वराविष्कार- ∙ सुधीर फडके∙ जी. एन्‌. जोशी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – भावगीत, कविता

  टीप – • काव्य रचना- १९३४.• स्वर- सुधीर फडके, संगीत- राम फाटक.• स्वर- जी. एन्‌. जोशी, संगीत- जी. एन्‌. जोशी.

सात जन्मांची निनावी आशा धरून

सात जन्मांची निनावी आशा धरून मनात
बकुळफुला कधीची तुला धुंडते बनात

टाकून दूर नदीच्या पार
उघडे माझ्या घराचे दार
सदैव पीशी हिंडते अशी नि:संगपणात

टाकून सारा शृंगारसाज
तुझ्याचसाठी फिरते आज
होईल कसे? झाले रे हसे सगळ्या जनांत !

श्रावणघनगर्जन वाजे
दिपव दोन्ही नयन माझे
एका आंधळ्या गहन निळ्या सोनेरी क्षणांत

गीत – ना. घ. देशपांडे

संगीत – यशवंत देव

स्वर- मंगला नाथ

गीत प्रकार – भावगीत

डाव मांडून भांडून मोडू नको

डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको

आणले तू तुझे सर्व, मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको

सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे
चंद्रज्योतीरसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको

‘गोकुळीचा सखा’ तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको

काढले मी तुझे नाव, तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून, लाजून, खोडू नको

गीत – ना. घ. देशपांडे

संगीत – राम फाटक

स्वर- सुधीर फडके

राग – पहाडी

गीत प्रकार – भावगीत