Showing posts with label प्र. के. अत्रे. Show all posts
Showing posts with label प्र. के. अत्रे. Show all posts

ललना देवता जगाची ।

ललना देवता जगाची ।
भूषवि संसाराला ॥

नभी जशि चंद्रिका हासरी तारका ।
स्त्री तेवि जगताला ॥

गीत – प्र. के. अत्रे

संगीत –

स्वर- सुरेश हळदणकर

नाटक – जग काय म्हणेल

गीत प्रकार – नाट्यसंगीत

यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया,

यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता !

हालती कशा या लाटा
फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता?
प्रेमगंगा ही वहाता
घ्या उडी घ्या, का पाहता? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ, अरसिका, का दवडिता?

गीत – प्र. के. अत्रे

संगीत – दादा चांदेकर

स्वर- मीनाक्षी शिरोडकर

चित्रपट – ब्रह्मचारी

गीत प्रकार – चित्रगीत

भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा ।

भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा ।
गमत उदयाला आला ॥

सकल कामना सफला ।
मनीषा या होति पूर्ण ।
भ्रमनिरास झाला ॥

गीत – प्र. के. अत्रे

संगीत – छोटा गंधर्व

स्वर- प्रसाद सावकार

नाटक – लग्‍नाची बेडी

गीत प्रकार – नाट्यसंगीत

भरजरी ग पीताम्बर दिला फाडुन

भरजरी ग पीताम्बर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी?”
पाठची बहीण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न

गीत – प्र. के. अत्रे

संगीत – वसंत देसाई

स्वर- आशा भोसले

चित्रपट – श्यामची आई

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, चित्रगीत

छम छम छम । छम छम छम

छम छम छम । छम छम छम
छडी लागे छम छम । विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ । छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिशा
डोळे एवढे एवढे लाल
दंतोजीचा पत्ता नाही
खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी
भिंती झाल्या घाण
पचा पचा शिव्या देई
खाता खाता पान
“मोर्‍या मूर्खा ! गोप्या गद्ध्या !” देती सर्वां दम

तोंडे फिरवा पुस्ती गिरवा
बघु नका कोणी
हसू नका, रडू नका
बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम । “ओनमा सिद्धम्‌”

गीत – प्र. के. अत्रे

संगीत – वसंत देसाई

स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर

चित्रपट – श्यामची आई

गीत प्रकार – बालगीत, चित्रगीत

चले जाव, चले जाव, चले जाव !

चले जाव, चले जाव, चले जाव !

हिंदुस्थान माझा देश
माझा प्यारा भारत देश
मालक मी या भूमीचा
माझी शेते, माझे डोंगर
माझी गंगा, माझा सागर
हिमालयाच्या शिखरावरुनी
सांगुं जगाला सार्‍या गर्जुनि
खबरदार जर इथे याल तर
सांडतील रक्ताचे सागर

तुम्ही-आम्ही भाई-भाई
भारतमाता आमुची आई
बच्चे आम्ही शूरांचे
वारस आम्ही वीरांचे
फौज आमुची चाळिस कोट
फोडूं साम्राज्याचे कोट
शेतकर्‍यांचे कामकर्‍यांचे
निशाण धरुनी उंच क्रांतिचें
फोडूं नरडें जुलुमशाहिचें
मंत्र गर्जुनी स्वातंत्र्याचे

देशासाठी आम्ही मरूं
प्राणांचे बलिदान करूं
मोडुनि टाकूं हे शतखंड
गुलामगिरिचे साखळदंड
चला तिरंगी धरुनि निशाण
स्वतंत्र करूं या हिंदुस्थान
नव्या युगाचा वाजे डंका
मानवतेच्या ऐका हाका
अडवे येतिल त्यांना ठोका
एकमुखाने करा गर्जना

चले जाव, चले जाव, चले जाव !

गीत – प्र. के. अत्रे

संगीत – गोविंद कुरवाळीकर

स्वर- गोविंद कुरवाळीकर

गीत प्रकार – स्फूर्ती गीत