Showing posts with label साने गुरुजी. Show all posts
Showing posts with label साने गुरुजी. Show all posts

खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम

खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

जयांना कोणि ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा
तयाने प्रेममय व्हावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

गीत – साने गुरुजी

संगीत –

स्वर-

गीत प्रकार – स्फूर्ती गीत, प्रार्थना

  

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारिन, या बंधु सहाय्याला हो

हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो

गीत – साने गुरुजी

संगीत – वसंत देसाई

स्वराविष्कार- ∙ आकाशवाणी गायकवृंद, वाणी जयराम∙ सुधीर फडके( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

  टीप – • स्वर- आकाशवाणी गायकवृंद, संगीत- वसंत देसाई.• स्वर- सुधीर फडके, संगीत- सुधीर फडके.

भारतमाता माझी लावण्याची गा

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, देइन माझे प्राण
हाती घेतले आहे मी सतिचे वाण

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रूढिरान, छाटिन रूढिरान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्‍नान

सर्वस्वाचे दान करिन मी, सर्वस्वाचे दान
घेतो आज मी आण, घेतो घोर मी आण
मातेला घडविन माझ्या मोक्ष-अमृतपान

गीत – साने गुरुजी

संगीत – बाळ चावरे

स्वर- आकाशवाणी गायकवृंद

गीत प्रकार – स्फूर्ती गीत

  टीप – • काव्य रचना- मे १९३२, धुळे तुरुंग.