तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो
वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो
अव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे
काटेकुटे विखारी वेचित चाललो
दाही दिशांत वेडा वैशाख मातला
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो
ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो
गीत – सुधीर मोघे
संगीत – राम फाटक
स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी
गीत प्रकार – भावगीत