Showing posts with label जगदीश खेबूडकर. Show all posts
Showing posts with label जगदीश खेबूडकर. Show all posts

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा प

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली ग मऊ मऊ मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची गोरीगोरी काया
बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना

खेळवा लाडानं गोपा बायांनो
गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचं हा राजा देखणा

कुर्रर्र करा कानात, हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगर्‍या वाटा ग
आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – एन्‌. दत्ता

स्वर- उषा मंगेशकर

चित्रपट – बाळा गाऊ कशी अंगाई

गीत प्रकार – चित्रगीत

हवास तू हवास तू, हवास मज तू

हवास तू हवास तू, हवास मज तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू?

मदनासम हे रूप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन्‌ प्रकाश तू

या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भरदिवसा हो रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू

तारुण्याच्या झाडावरती, मोहक हो‍उनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी, करशील का रे प्रयास तू

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- आशा भोसले

चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा

गीत प्रकार – चित्रगीत

इथे मिळाली सागर-सरिता

इथे मिळाली सागर-सरिता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

कमलफुलांचे सुगंध सिंचन की भ्रमराला गोड निमंत्रण
मिटे पाकळी मीलन घडता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

या धरणीची हाक ऐकिली, निळे गगन हे झुकले खाली
क्षितिजावरही प्रेम सांगता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

बांधु अपुले घरकुल चिमणे, तुझियासाठी माझे जगणे
मरणा येईल चिरंजीविता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – हेमंत केदार

स्वर- कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर

चित्रपट – तोचि साधू ओळखावा

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत

झन झननन छेडिल्या तारा

झन झननन छेडिल्या तारा
पदी नूपुर बोलती तत्कारा

मदन मेनका मस्त मयूरी
आरसपानी रूप बिलोरी
नर्तनातुनी आवर्तन हे उधळी रंग पिसारा

यौवनातल्या वनी उर्वशी
प्रणय खेळते रेशीम स्पर्शी
लहरीमधुनी बहर येऊ दे आतुरल्या शृंगारा

सूर-ताल जणू संगम झाला
शब्द सुगंधी मधात न्हाला
मुके होउनी धुके मुलायम बरसत अमृतधारा

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – विश्वनाथ मोरे

स्वर- सुरेश वाडकर

चित्रपट – हळदी कुंकू

राग – मधुवंती

गीत प्रकार – चित्रगीत

कधी तू हसावे कधी तू रुसावे

कधी तू हसावे कधी तू रुसावे
नको ग नको ग नको साजणी !

सखी प्रीत माझी तुला वाहिली
तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली
नको हा बहाणा, असा दूर जा ना
नको ग नको ग नको साजणी !

कळी लाजरी ही फुलेना कशी
तिला भावना ही कळेना कशी
मुखी गोड भाषा, अशी ही निराशा
नको ग नको ग नको साजणी !

प्रिये राहसी तू मनी मानसी
जगावेगळी तू अशी प्रेयसी
मलाही कळावे, तुलाही जुळावे
नको ग नको ग नको साजणी !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – एन्‌. दत्ता

स्वर- उषा मंगेशकर, रवींद्र साठे

चित्रपट – प्रीत तुझी माझी

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत

कधी ऊन तर कधी सावली

कधी ऊन तर कधी सावली, खेळ असा हा घडे

आज विषाचा प्याला देई, दैव तुझ्या हाती
डोळे मिटुनी घोट घ्यावया लाव असा ओठी
भगवंताने दिले भोग हे, भोगून जा तू पुढे

काट्यांमधुनी वाट काढिता रक्त ठिबकते पायी
तरी संकटी निर्धाराने अशी उभी तू राही
धागा तुटला, पतंग तरी हा वार्‍यावरती उडे

सीतेच्या पदरात मिळाली वनवासाची ओटी
तीने अश्रूंचे अमृत पाजून अंकुर जपले पोटी
असेच असते जिणे सतीचे, दु:खाच्या पलीकडे

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर- मन्‍ना डे

चित्रपट – पाहुणी

गीत प्रकार – चित्रगीत

मज खेळणी नको ती

मज खेळणी नको ती
जादू नको नवी, आई मला हवी !

रगडून अंग माझे घालील रोज न्हाऊ
शाळेत खावयाला देईल गोड खाऊ
रात्री कुशीत घेई, मज रोज झोपवी

खोड्या करून येता मज रागवील खोटे
गालांवरून माझ्या फिरविल गोड बोटे
सांगे ‘शुभंकरोती’, देवास आळवी

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – शारंग देव

स्वर- साधना सरगम

गीत प्रकार – बालगीत

डेरेदार बहरलं झाड

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड खुणवतो आंबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं
टकमक टकमक बघू नका हो
मागं मागं लागू नका

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू पावणं जरा थांबा

वाण अस्सल, तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला
हिरवट गोडी, आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा
नका तोडू, पावणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा थोडक्यात आवरा
कईकांनी धरला दबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर- उषा मंगेशकर

चित्रपट – पिंजरा

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी

ओवाळिते मी लाडक्या भाऊराया चं

ओवाळिते मी लाडक्या भाऊराया

चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया

दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली
कळस होउनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया

डोळे दोन ज्योती, तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
आतुरली पूजेला माझी काया

गुणी माझा भाऊ, याला ग काय मागू
हात जोडुनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – प्रभाकर जोग

स्वराविष्कार- ∙ कु. शुभांगी∙ आशा भोसले( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

चित्रपट – ओवाळिते भाऊराया

राग – भैरवी

गीत प्रकार – चित्रगीत

नवतीची प्रीतीची काया शिणगार

नवतीची प्रीतीची काया शिणगार ल्याली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

धुंदीत डोलते, वार्‍याने फुलते कळी, फुलुन आली कळी
दंवात बुडली, पानात दडली खुळी, कशी ग बाई खुळी
पाखरू घुमलं गाण्यात रमलं घुमतंया अंतराळी
ओढ ही भेट ही जीवाशिवाची झाली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

स्वप्‍नात हसतो, संसार दिसतो असा, महाल बाई जसा
येईल अंगणा, साजण देखणा कसा, मदन बाई जसा
हातात हात ग गुलाबी साथ ग चंद्राचा शिडकावा
कावरीबावरी रात किरणांत न्हाली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

नवी मी नवरी, मुलखाची लाजरी राणी, राजाची माझ्या राणी
अंगाला चढलं कळसाचं पिवळं पाणी, हळदीचं नवं पाणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी गाऊ मिळून गाणी
कोण मी? कोण तू? जाण विसरून गेली ग
फुलं स्वप्‍नाला आली ग !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले

चित्रपट – जोतिबाचा नवस

गीत प्रकार – चित्रगीत, कल्‍पनेचा कुंचला

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !
फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !

मऊमऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडेतिकडे, दंवबिंदूंनी न्हालो

फुलाफुलावर बसतो मी, खुदकन गाली हसतो मी
डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो

नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे
क्रूरपणा हा बघुनी तुमचा, मनोमनी मी भ्यालो

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – शारंग देव

स्वर- दुर्गा जसराज

गीत प्रकार – बालगीत

आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाल

आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला
रवि आला हो रवि आला

झाडेपाने फुलवेली हो
थेंब दंवाचे ल्याली हो
प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला

कवाड-अंगण उजळावे
फुलासवे मन उमलावे
हसली सदने हसली वदने, तम विरुनी गेला

करू आरती तेजाची
तेजाची रविराजाची
मंगल ऐका मंगल देखा, मंगलमय बोला

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – प्रभाकर जोग

स्वर- सुधीर फडके

चित्रपट – देवघर (१९८१)

गीत प्रकार – चित्रगीत

हा महाल कसला? रानझाडी ही दाट अ

हा महाल कसला? रानझाडी ही दाट
अंधार रातीचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी?
सख्या रे, घायाळ मी हरिणी !

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी? कशी लपू मी? गेले भांबावुनी !

गुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी? कशी पळू मी? गेले मी हरवुनी !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – भास्कर चंदावरकर

स्वराविष्कार- ∙ लता मंगेशकर∙ रवींद्र साठे( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

चित्रपट – सामना

राग – सोहनी

गीत प्रकार – चित्रगीत

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे हो‍उनी निःसंग

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर- पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे

चित्रपट – भोळी भाबडी

राग – यमन

गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत

  टीप – • सहस्वर- विष्णू वाघमारे, जी. मल्लेश.

फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूं

फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली

गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली

हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली

पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळ-मंजिरी, तालावर वाजली

सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – दत्ता डावजेकर

स्वर- आशा भोसले

चित्रपट – पाच नाजूक बोटे

गीत प्रकार – राम निरंजन, चित्रगीत

राधा रमणी मोहन हरिणी

राधा रमणी मोहन हरिणी, चाले चपल चरणी
ठुमकत आल्या किती गौळणी

आले नेसून काळी चंद्रकळा
सोळा शिणगार आले घालून गळा
घडा लाजेचा डोईवर डुचमळला
अन्‌ भिजली तनू देखणी

आली चंद्रावळ मी नखर्‍याची
लाल पैठण जरीच्या पदराची
जशी रंभा अप्सरा इंद्राची
उभी धरणीच्या अंगणी

नको कान्हा अशी ही बळजोरी
मथुरेच्या जाऊ दे बाजारी
दिस बुडताना येईन माघारी
तुज पुरवीन मी मागणी

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – यशवंत देव

स्वर- आशा भोसले

चित्रपट – मंत्र्यांची सून

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी

यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर

यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर
कुणी म्हणे गिरिधर नरवर नटवर
कुंजवनी खेळतो रासरंग
एक नटरंगी नार करी सोळा शिणगार
आली छन्‌न्‌न्‌ नाचत उडवी बहार
किती आल्या गोपगोपिका
कन्हैया सखा छेडतो राधा सखीला
कसा कसा कसा? असा !

अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग

घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
मदनाचं रूप घेई राजा श्रीरंग

ढंग न्यारा तुझा, असा तरूणपणा
तुझा शिणगार करतोया खाणाखुणा
दंडामध्ये कसली ग काचोळी ही तंग

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – विश्वनाथ मोरे

स्वर- उत्तरा केळकर, सुरेश वाडकर

चित्रपट – गोंधळात गोंधळ

राग – शंकरा

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, चित्रगीत

बसेना अजुनी कैसा मेळ

बसेना अजुनी कैसा मेळ
चालला संसाराचा खेळ

ज्याला-त्याला छंद वेगळा
जणू सावळा गोंधळ सगळा
घटात नाही पाणी आणिक दिव्यात नाही तेल

कसली पूजा? कसली सेवा?
विटंबना ही तुझीच देवा
फूल मिळेना म्हणुनी आणिला त्रिगुणांचा हा वेल

विस्कटलेली घडी बसावी
उणीव कसली कुणा नसावी
सावरून घे दयाघना तू, आणीबाणीची वेळ

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – विश्वनाथ मोरे

स्वर- सुधीर फडके

चित्रपट – येथे शहाणे रहातात

गीत प्रकार – चित्रगीत

अवं हे गाव लई न्यारं

अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना
ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हितं शाहिरी लेखणी पोचंना
हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगाढोंगाचा बाजार इथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी
अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ भायेर नळी रं रं रं

अगं चटकचांदणी, चतूर कामिनी
काय म्हणूं तुला, तू हायेस तरी कोन

छबीदार छबी मी तोर्‍यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं

नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं

डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा
ओढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं

मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर- उषा मंगेशकर

चित्रपट – पिंजरा

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी

यमधर्माचा दूत कुणीही

यमधर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा
धन्य हा सावित्रीचा चुडा

भर दरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा
धन्य हा सावित्रीचा चुडा

सती अहल्या गौतम-कांता, मुनीवेशाने तिला भोगिता
देवेंद्राच्या देवत्त्वाला तिथेच गेला तडा
धन्य हा सावित्रीचा चुडा

यवन धावला पाठी म्हणुनी, जळुनी गेली सती पद्मिनी
जोहाराची कथा सांगतो, अजुनी तिथला कडा
धन्य हा सावित्रीचा चुडा

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – प्रभाकर जोग

स्वर- आशा भोसले

चित्रपट – चुडा तुझा सावित्रीचा

गीत प्रकार – चित्रगीत