Showing posts with label ग्रेस. Show all posts
Showing posts with label ग्रेस. Show all posts

घर थकलेले संन्यासी

घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी

मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलकेहलके मागे त्या दरीतली वनराई

गीत – ग्रेस

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर

चित्रपट – निवडूंग

गीत प्रकार – चित्रगीत, आई, नयनांच्या कोंदणी

वाकल्या दिशा फुलून

वाकल्या दिशा फुलून स्‍निग्ध रंग सावळा,
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा

पावलें अशीं सलील नादती कुठून नाद?
मी क्षितिज वाहतों तरी जुळे न शब्द, गीत.

दु:ख एक पांगळें जशी तरूंत सावली
या उरांत पेटलीस, कां उन्हास काहिली?

असे कसें सुनें सुनें मला उदास वाटतें
जशी उडून पांखरें नभांत चाललीं कुठें?

गीत – ग्रेस

संगीत – श्रीनिवास खळे

स्वर- अरुण दाते

गीत प्रकार – भावगीत

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

गीत – ग्रेस

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

राग – यमन

गीत प्रकार – भावगीत

  टीप – • शीर्षक गीत, मालिका- महाश्वेता, वाहिनी- सह्याद्री.

घनकंप मयूरा, तुला इशारा

घनकंप मयूरा, तुला इशारा
खोल पिसारा, प्राण आडवा पडे
तू वळशिल माझ्याकडे?

घनकंप मयूरा
घनसंथ मयूरा
घननीळ मयूरा
घनदंग मयूरा
घनरंग फकिरा

घनसंथ मयूरा धूळ दरारा
कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती
गीतांतुन गळते माती

घननीळ मयूरा रंग फकिरा
तुला पहारा? कातडे वाळत्या वेळी
ते भीषण ऊन कपाळी

घनदंग मयूरा, नको सहारा
हलका वारा, बिंदीत चंद्र थरथरते
ती वस्त्र कुठे पालटते

गीत – ग्रेस

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

अल्बम – मैत्र जीवाचे

गीत प्रकार – भावगीत