Showing posts with label शाहीर होनाजी बाळा. Show all posts
Showing posts with label शाहीर होनाजी बाळा. Show all posts

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लौकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनू हंबरती
लक्षिताति वांसुरें हरी धेनुस्तनपानाला

सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षीं

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – वसंत देसाई

स्वर- पंडितराव नगरकर, लता मंगेशकर

चित्रपट – अमर भूपाळी

राग – देसकार, भूप

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर

लटपट लटपट लटपट लटपट तुझं चालणं

लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखर्‍याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ

कांती नव नवतिची दिसे चंद्राचि प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
तारुणपण अंगांत झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखर्‍याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ

रूपसुर्तिचा डौल तेज अनमोल सगुण गहिना
जशी का पिंजर्‍यांतिल मैना
इच्यासाठिं कितिकांची जनलोकांत झालि दैना
अशी ही चंचल मृगनयना
इच्यासाठिं कितिकांची जनलोकांत झालि दैना
निर्मळ कोमळ तेज ग जैसे तुटत्या तार्‍याचं
चालणं ग मोठ्या नखर्‍याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – वसंत देसाई

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – अमर भूपाळी

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी

सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा

सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा !

हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा !

समक्ष तुमच्या बसुनी तुम्हांसीं
नाहीं आजवर भाषण केलें
सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले
सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा !

मर्जि मिळाली असतां अलीकडे
तुम्ही जातां टाकून वहिलें
सजणा, वाटते जिवंत असुनि मी मेलें
सजणा, नको दूर देशीं जाऊं सजणा !

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – वसंत देसाई

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – अमर भूपाळी

गीत प्रकार – चित्रगीत

श्रीरंगा कमलाकांता

श्रीरंगा कमलाकांता
हरि पदरातें सोड

ब्रिजवासी नारी
जात असो कीं बाजारीं
कान्हा का मुरारी
अडवितां कां कंदारी
मथुरेची बारीं
पाहुं मजा हो गिरिधारी
विकुन नवनित दधि गोड
हरि पदरातें सोड

ऐका लवलाही
गृहिं गांजिति सासूबाई
परतुनिया पाहीं
येउं आम्ही ईश्वरग्वाही
दान देऊन काही
मग जाऊं आपले ठाईं
पतिभयानें देह रोड
हरि पदरातें सोड

विनवुनी कृष्णासी
शरणागत झाल्या दासी
आणिल्या गोपि महालासी
होनाजीरायासी
जा मुकुंदा सोड रे

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – हेमंत केदार

स्वराविष्कार- ∙ सुरेश हळदणकर∙ रामदास कामत( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत होनाजीबाळा

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत

घडी घडी अरे मनमोहना

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं
भरम धरिल जन तुझा नि माझा पहा पुरती चौकशी

छबीदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी आवडलीस माझ्या मना
कुठें दिसेना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा

तुझीं प्रीत लाधली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झालें पिसीं
सजणा नको रे बोलूं मशीं
सजणी नको ग बोलूं मशीं

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं

दिसतेस चटकचांदणी अगे साजणी मनीं तू ठसलीस आमच्या गडे
छंद लागला तुझा आम्हांला रात्रंदिन फांकडे
निजध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी घरीं मी सिद्ध करुनिया विडे
घरीं मी सिद्ध करुनिया विडे
एकान्‍ति मुखी घालतां चकाकतील-
माझ्या हातांतील चुडे
इश्काची चटक लागली जीवा चांगली रंगली वृत्ति तुजपाशीं
सजणा नको रे बोलूं मशीं
सजणि नको ग बोलूं मशीं

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं

गीत – शाहीर होनाजी बाळा

संगीत – वसंत देसाई

स्वर- पंडितराव नगरकर, लता मंगेशकर

चित्रपट – अमर भूपाळी

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी, युगुलगीत