जगाचे बंध कोणाला, जगाला बांधला त्याला !
मला जो थांबवी ऐसा, जगीं निर्बंध ये कैसा?
जगानें देह हा केला, जगाला वाहिलें त्याला;
हाणा मारा खुडा तोडा, परि आतां मला सोडा !
न कीर्तीला, न प्रेमाला, न सौख्याला, विलासाला,
न विघ्नाला, न मृत्यूला, मला ये आडवायाला !
पुरे संबंध प्रेमाचा, नको हा खेळ प्रेमाचा,
मिळे ज्या प्रीतिचा प्याला, विषारी तो असा मेला ! [१]
गीत – बालकवी
संगीत – छोटा गंधर्व
स्वर- छोटा गंधर्व
नाटक – उद्यांचा संसार
गीत प्रकार – नाट्यसंगीत
टीप – • काव्य रचना- एप्रिल १९१४.• [१] – मूळ कवितेतील ओळ’खरा जो प्रीतिचा प्याला- जगीं प्याला सुखी झाला.’