Showing posts with label राजा बढे. Show all posts
Showing posts with label राजा बढे. Show all posts

जन लोका विस्मय हा

जन लोका विस्मय हा
दुंदुभीरव ये मंत्रनिनादे भद्रासनी अभिषेका

नमवी शीर्ष जलकुंभस्त्रावा
मिटे न परि विधिलेखा
द्रववित मन, तनु कंपविकल ती तात राजमुद्रा

गीत – राजा बढे

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर- नारायण बोडस

नाटक – धाडिला राम तिने का वनी?

राग – मियांकी सारंग

गीत प्रकार – नाट्यसंगीत

झाली पहांट, झाली पहांट

झाली पहांट, झाली पहांट

विरे काळोखाचा वेढा
चांद वळला वांकडा
वाजे राउळीं चौघडा, डुले दारीचा केवडा
भवती जंगल दाट

साद घालितो कोंबडा
‘उठा नयन उघडा’
पहा उजळल्या कडा, पडे प्राजक्ताचा सडा
खचली पाऊलवाट

घरघर घरोघरीं
सूर मंजुळ लहरी
तरंगत वार्‍यावरी जाती पहिल्या प्रहरी
गाती सृष्टीचे भाट

जातां गुंजती गौळणी
मंद पैंजणपावलीं
कटि कुंभ आंदोलती, गानीं गुंग भृंगावली
बोले पाणियाचा घाट

झोपडींत मायलेकीं
दळताती सासूसूना
तुझे पाऊल पडूं दे अंगणांत नारायणा
उजळित पुढली वाट

गीत – राजा बढे

संगीत – पु. ल. देशपांडे, केशवराव भोळे

स्वर- ज्योत्‍स्‍ना भोळे

गीत प्रकार – भावगीत

कधींतरी कुठेंतरी फिरून भेटशील

कधींतरी कुठेंतरी फिरून भेटशील का?
अनोळखी मुशाफरा हसून बोलशील का?

पाहिलें पुन्हां पुन्हां
झाकला तुझा गुन्हा
लाजेची नजरझुंज लपुन खेळशील का?

जीभ का जडावली?
जाशि परत पाउली
जातांना एकदां वळून पाहशील का?

या मनांतली छबी
या इथेंच की उभी
ओढ लागली तुझी, कळून हासशील का?

गीत – राजा बढे

संगीत – डी. पी. कोरगावकर

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – गळ्याची शपथ

गीत प्रकार – चित्रगीत

कधी भेटेन …

कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला
मला ते पाय अंतरले, कुळाला काळिमा आला

कशी राहील कांतारी विरागी जानकी राणी
तिच्या वाटेवरी आता फुलांनो पाकळ्या घाला

तुझे सौभाग्य सौमित्रा, वनी तू राघवासंगे
अभागी मीच हा ऐसा जाउनी सांग रामाला

गीत – राजा बढे

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वराविष्कार- ∙ अरविंद पिळगांवकर∙ शौनक अभिषेकी( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – धाडिला राम तिने का वनी?

राग – मिश्र सूर्यकंस

गीत प्रकार – राम निरंजन, नाट्यसंगीत

  टीप – • काव्य रचना- ३ जानेवारी १९५१.

नका मारुं खडा, शिरीं भरला घडा

नका मारुं खडा, शिरीं भरला घडा
सख्या जाईल तडा, हें भिजेल गोरें अंग
ऐके न बाई तरि, हसे खदखदा असा कसा श्रीरंग

नको धरूं हात रे पिचेल माझा चुडा
सुटेल बाइ जुडा, अवखळा, भिजतिल काजळकडा
ऐके न बाई तरि, करि नयन वाकडा

थंडीत भरे हुडहुडी, थरकांपे माझी कुडी
ती खरी सुखाची घडी
घे बळेच ओढुनी कवळी रेशमी शेला

अधरीचा मधुरमधु मेवा, मुरलीस वाटला हेवा
हे असे काय हो देवा?
आतां फुटु द्या घडा, खुशाल मारा खडा
यापुढें कधिं न मी करीन हो ओरडा

गीत – राजा बढे

संगीत – गजानन वाटवे

स्वर- गजानन वाटवे

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत

थांब रे पथिका जरा जा ऐकुनी माझ

थांब रे पथिका जरा जा ऐकुनी माझी कथा
नीट घे पाहोनिया नांवाजल्या प्रीतीपथा

दिसति तुज वाटेवरी या, उमटलीं हीं पाउलें
चुरली किति पायातळी हृदयें तयानें चालतां

काजळांतुनि वाहिलीं गुपितेंच कीं गालावरी
पुसली न कोणी आंसवें, कोणा न कळली रे व्यथा

गीत – राजा बढे

संगीत – भानुकांत लुकतुके

स्वर- श्यामा चित्तार

गीत प्रकार – भावगीत

  टीप – • काव्य रचना- १५ ऑगस्‍ट १९५१.

अक्रूरा नेऊ नको मथुरेला

अक्रूरा नेऊ नको मथुरेला, प्रियकर अमुचा श्याम

घेरति रथ प्रियजन व्रजकुमरी ओढिति धरुनी शेला
गोकुळजन वृंदावनवासी आळविती अलबेला

नेऊ नको ना राजस राणा माझा छेल छबेला
सोडुनि जाशी सावळिया रे, तुजविण जीव भुकेला

कदंब गाळी आसु फुलांचे- पूर येइ यमुनेला
येइल का कधि परत गोकुळी हंस उडोनी गेला

रडुनि रडुनि वाट भिजे- धूळ उडेना पाही
दूर दूर रथ जाता दृष्टि पडेना काही

गीत – राजा बढे

संगीत – पांडुरंग दीक्षित

स्वर- विनोदिनी दीक्षित

गीत प्रकार – भावगीत

डोळे मोडित गौळण राधा

डोळे मोडित गौळण राधा
हिला जडली मोहन बाधा

भाळल्या कितिक गौळणी
राधिका कोर चांदणी
बाळ मुकुंद राजस गुणी
कसे बाई लाविले नादा

किती बाई काळाकाळा
दिसे अचुकच कान्हा डोळा
वरपांगी भाव ग भोळा
नाही नंदलाल हा साधा

मुरलीची करी ग पिचकारी
रंगवी हरी ब्रिज नारी
लाजता हसे गिरिधारी
रंगात रंगली राधा

गीत – राजा बढे

संगीत – स्‍नेहल भाटकर

स्वर- आशा भोसले

चित्रपट – संत बहिणाबाई

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर, नयनांच्या कोंदणी

गड्या रे प्रपंच हा लटका

गड्या रे प्रपंच हा लटका
गुरफटता मायाजालि नाहि रे सुटका

कामिनी रूपसुंदरा
धनदौलत येई घरा
उदराचा भरशी दरा
कुरवंडी करशी काढुनि काळिज कुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

क्षणभंगुर सुख ओसरे
संसारी जीवन सरे
घडिघडी गळे पाझरे
किति जपशिल वेड्या देह कटोरा फुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

तो दीनबंधु भूवरी
वैकुंठ करी पंढरी
आठवी सावळा हरी
हरिनाम करील भवपार जिवाची सुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

गीत – राजा बढे

संगीत – सुधीर फडके

स्वर- सुधीर फडके

चित्रपट – माझी आई

गीत प्रकार – चित्रगीत