Showing posts with label वा. रा. कांत. Show all posts
Showing posts with label वा. रा. कांत. Show all posts

झुळूक आणखी एक- आणखी एक पान गळल

झुळूक आणखी एक- आणखी एक पान गळलें !

पानीं फुलला सुमनिं बहरला
माझ्या अंगणिं जरि तरू वठला
शुष्क डहाळिंत अंग मोडिती कोंब नवे इवले !
– आणखी एक पान गळलें !

चंद्रकोर अंगांगीं भरली
दिनदिन कणकण उजळुन खिरली
परि अवसेच्या प्रभात-ओटिंत सूर्यबिंब भरले !
– आणखी एक पान गळलें !

खुशाल गळतां, गळा दळांनो
हसत सरा माझिया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानडिंत मी अक्षयपण उमले !
– आणखी एक पान गळलें !

गीत – वा. रा. कांत

संगीत – श्रीधर फडके

स्वर- श्रीधर फडके

गीत प्रकार – कविता

खळेना घडिभरही बरसात

खळेना घडिभरही बरसात
दिवस संपला, नागिणकाळी उतरे सळसळ रात

नक्षत्रांसह दिशा लोपल्या
वाटा अंधाराने गिळिल्या
असेल कोठे सखा? पाऊले वाजति परि थेंबात

गडगडणे थांबवा घनांनो,
कडकडणे आवरा विजांनो,
बायांनो, का तुम्हाहि न कळे स्त्री हृदयाची मात

असेल आला पैलतटावर
येऊ द्या ग त्याला इथवर
संथ वहा ग सरिते तूही, येतो माझा नाथ

गीत – वा. रा. कांत

संगीत – बाळ बर्वे

स्वर- पुष्पा पागधरे

गीत प्रकार – भावगीत

सखि शेजारिणि हास्य

सखि शेजारिणि, तू हसत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा

दीर्घ बदामी श्यामल डोळे
एक सांद्रघनस्वप्‍न पसरले
‘धूपछांव’ मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्‍ने रचित रहा

सहज मधुर तू हसता वळुनी
स्मित-किरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज खिन्‍न घनि लवत रहा

मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित-चाळ त्यास बांधून पहा

गीत – वा. रा. कांत

संगीत – वसंत प्रभु

स्वर- अरुण दाते

राग – पहाडी

गीत प्रकार – भावगीत

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरा

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत

त्या गाठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?

गीत – वा. रा. कांत

संगीत – श्रीनिवास खळे

स्वर- पं. वसंतराव देशपांडे

राग – पहाडी

गीत प्रकार – भावगीत