Showing posts with label वसंतराव पटवर्धन. Show all posts
Showing posts with label वसंतराव पटवर्धन. Show all posts

श्रमता मार्गी विश्रामांची विसर

श्रमता मार्गी विश्रामांची विसरू नको स्थाने
सांगतो तुज विस्ताराने

आम्रकूट तुज दिसेल ज्यावर पक्व फले गौर
पडता छाया तुझी काजळी त्याच्या अग्रावर
धरणिपयोधर त्यास मानतिल अमरांची मिथुने

दशार्णदेशी जाशिल तेव्हा, फुलतिल केवडकडे
घरटी करत्या ग्रामखगांनी गजबजतिल झाडे
तुजसह येतिल हंस, रंगतिल श्यामल जंबुवने

जरी लागली तरी करावी तिरकस ती वाट
उत्तरेस, बघ उज्‍जयिनीच्या सौधांचे घाट
लवता विद्युल्लता चकित तिथ ललनांची लोचने

बाणवनातिल देव वंदण्या थांब जरा पुढती,
कुरुक्षेत्रावर तिथून पुढे हो, जा ब्रह्मावर्ती
दमता जलदा, या स्थानावर शांति तुला लाभणे

हिमालयी जा कनखल शैली, मग कैलासाला
क्रौंच रंध्र मार्गात बघुनिया, प्यावे मानसजला
नजर टाक तू, तिथून अलका बघ आनंदाने

गीत – वसंतराव पटवर्धन

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी

गीत प्रकार – कविता, गीत मेघ, मालिका गीते

  टीप – • गीत क्रमांक ४• ‘गीत मेघ’ – अनुवादित ‘मेघदूत’मधून• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम – ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ (१९८०)• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर• सादरकर्ते- अरुण काकतकर• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन