चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल

चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी, गरम लोकरी शाल
पर झोप नाही आली, जागरण झालं काल
रंगमहाली ऊब असून का काटा फुलतोय नवा?
ग बाई बाई झोंबतो गारवा !

अंग नाजूक ग मला रुतली उशी
आली जांभई ग निजले बदलून कुशी
खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

रागारागानं मी गेले कोन्यात ग
चिंब न्हाऊन मी पाहिलं ऐन्यात ग
मनात माझ्या घुमु लागला मदनाचा पारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

आज आला तुम्ही माझी केली कदर
झाली नजरानजर, घेते लाजून पदर
खुशाल यावं जवळ घ्यावं, धरून हात आडवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – राम कदम

स्वर- आशा भोसले

चित्रपट – गणानं घुंगरू हरवलं

गीत प्रकार – चित्रगीत, लावणी