अ आ आई, म म मका

 अ आ आई, म म मका

मी तुझा मामा, दे मला मुका


प प पतंग आभाळात उडे

ढ ढ ढगांत चांदोमामा दडे

घ घ घड्याळ, थ थ थवा

बाळ जरि खट्याळ, तरी मला हवा


ह ह हम्मा गोड दूध देते

च च चिऊ अंगणात येते

भ भ भटजी, स स ससा

मांडीवर बसा नि खुदकन हसा


क क कमळ पाण्यावर डुले

ब ब बदक तुरुतुरु चाले

ग ग गाडी झुक झुक जाई

बाळ माझे कसे गोड गाणे गाई


गीत  -  मधुसूदन कालेलकर

संगीत  -  राम कदम  

स्वर- मन्‍ना डे

चित्रपट  -  एक धागा सुखाचा  

गीत प्रकार  -  बालगीत, चित्रगीत



हरि ॐ हरि ॐ !

हरि ॐ हरि ॐ !
प्रणव ओंकार शिवा
हृदयांत उजळू दे सूर्यदेवा
हरि ॐ हरि ॐ !

स्वरचक्र उलगडे तानांचे
हे बोल खोल मम प्राणांचे
प्रतिभेचा हुंकार नवा
हरि ॐ हरि ॐ !

तिमिरांत सभोंती गगनप्रभा
ज्योतीर्मय त्यातून दिव्य सभा
विलसू दे रुपेरी चंद्रथवा
हरि ॐ हरि ॐ !

गीत – गुरुनाथ शेणई

संगीत – भानुकांत लुकतुके

स्वर- रामदास कामत

गीत प्रकार – प्रार्थना

हरी मेरो जीवन प्राण-अधार

हरी मेरो जीवन प्राण-अधार

और आसरो नाहीं तुमबिन तीनो लोक मज़ार

आपबिना मोहे कछु ना सुहायो निरख्यो सब संसार

मीरा कहे मै दासी बावरी दीज्यौ मती बिसार

गीत – विद्याधर गोखले

संगीत – पं. राम मराठे

स्वराविष्कार- ∙ पं. राम मराठे∙ मधुवंती दांडेकर

नाटक – मंदार-माला

राग – मिश्र पिलू

ताल-केरवा

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत

हरीभोवती नित्य नाचतो भक्तांचा

हरीभोवती नित्य नाचतो
भक्तांचा मेळा
हरी भक्तिचा भुकेला

पहाटसमयी जात्यावरती
दळू लागला जनीसंगती
ओवी गाऊन हा जगजेठी
भक्ताघरी रंगला

घास घेई नारायणा
नामदेव तो हट्ट सोडिना
श्रीपतिराणा त्रिभुवनाचा
भक्तासवे जेवला

कबिराघरचे विणले शेले
भक्त-प्रभु ते एकची झाले
भक्तासवे त्या प्रभु नाचले
घेउनी भक्ति-ध्वजा

गीत – योगेश्वर अभ्यंकर

संगीत – गोविंद पोवळे

स्वर- माणिक वर्मा

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भक्तीगीत

हरिभजनावीण काळ घालवूं नको रे !

हरिभजनावीण काळ घालवूं नको रे ! ॥१॥

दोरिच्या सापा भिऊनि भवा । भेटि नाहीं जिवा शिवा ।
अंतरिंचा ज्ञानदिवा मालवूं नको रे ! ॥२॥

विवेकाची ठरेल ओल । ऐसे बोलावे कीं बोल ।
आपुल्या मतें उगीच चिखल कालवूं नको रे ! ॥३॥

संत संगतीने उमज । आणुनि मनिं पुरतें समज ।
अनुभवावीण मान हालवूं नको रे ! ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योति । तेथें कैंचि दिवसराति ।
तयाविण नेत्रपातिं हालवूं नको रे ! ॥५॥

गीत – संत सोहिरोबानाथ

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वराविष्कार- ∙ पं. जितेंद्र अभिषेकी∙ दशरथ पुजारी∙ पं. हृदयनाथ मंगेशकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

गीत प्रकार – संतवाणी

  टीप – • स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी.• स्वर- दशरथ पुजारी, संगीत- दशरथ पुजारी.• स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट- अंतरीचा दिवा.

हरी अधरी, धरी मुरली

हरी अधरी, धरी मुरली
निनादत नाद कुंजवनी
मधुर मधुमास, पुरवी आस
रचिला रास गोपांनी

टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो मृदंग
नाचे तन, नाचे मन, नाचे अंतरंग
छन छननन छन छननन ताल पैंजणांतुनी
रचिला रास गोपांनी

लखलखती भवताली रम्य दीपज्योती
वदनांवर सर्वांच्या आगळीच कांती
नाचते राधिका देहभान हरपुनी
रचिला रास गोपांनी

गीत – शान्‍ता शेळके

संगीत – बाळ पळसुले

स्वर- आशा भोसले

चित्रपट – सासुरवाशीण

गीत प्रकार – चित्रगीत, हे श्यामसुंदर

लुटुलुटु धावत खुदुखुदु हासत

लुटुलुटु धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी

जाई-जुई फुलली
जिवाची कळी कळी फुलली
बघ चिमण्या अधरी
कशी ग बाई धरी चिमणी मुरली
ल्याला गोजिरवाणी, नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी

बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी, ब्रह्म सानुले उभे अंगणी

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – यशवंत देव

स्वर- सुमन कल्याणपूर

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत

हरवले ते गवसले का?

हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?

मीलनाचा परिमल तोचि, फूल तेचि त्या स्वरूपी
पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का?

पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरूनि मिळता
जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का?

दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले, तोचि सुखही दुखावले का?

गीत – पी. सावळाराम

संगीत – वसंत प्रभु

स्वर- लता मंगेशकर

राग – पूर्वा कल्याण

गीत प्रकार – भावगीत

हरवले माझे काहीतरी

हरवले माझे काहीतरी
काय हरवले कसे हरवले काही कळेना परि

सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगीच उमटला काटा अंगावरी

बघता बघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव निराळे
जागेपणी मज भूल घातली बाई कोणीतरी

लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले परि विसरले तेथे काहीतरी

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – वसंत पवार

स्वर- आशा भोसले

चित्रपट – बाळा जो जो रे

गीत प्रकार – चित्रगीत

हले, झुलत डुले पाळणा

हले, झुलत डुले पाळणा
प्राणफुला झोपी जा ना
जो जो रे

निजला गंध वारा, झोपला नभी तारा
पेंगुळला पानांवरी कळ्या-फुलांचा तुरा

पुनवा रात बोले, मीट तू बाळा डोळे
झोका देते रे, नीज लाडक्या चिमण्या छकुल्या राजिवा

पाळणा मंद होतो, आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला

गीत – स. अ. शुक्ल

संगीत – स्‍नेहल भाटकर

स्वर- लता मंगेशकर

चित्रपट – चिमुकला पाहुणा

गीत प्रकार – चित्रगीत