अजि राधा बाला मीच गोपाला ॥

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

आले चारायाला धेनूंना, मोहिले कंठ-मधुबले कृष्णाला ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – भास्करबुवा बखले

स्वराविष्कार- ∙ नीलाक्षी जुवेकर∙ बालगंधर्व( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

नाटक – संगीत स्वयंवर

राग – देसकार

ताल-त्रिताल

चाल-अमलारा माता

गीत प्रकार – हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत

अजि पुरवा ही हौस प्रियकरा

अजि पुरवा ही हौस प्रियकरा, मातृपदीं तनु मम बसवा ॥

स्त्री जगाला स्त्रीच विधाता, होत नाहीं जरि माता,
विश्व सुखीं विष कालवा ॥

गीत – कृ. प्र. खाडिलकर

संगीत – मास्टर कृष्णराव

स्वर- बालगंधर्व

नाटक – संगीत मेनका

ताल-त्रिताल

चाल-छिन छिनया

गीत प्रकार – नाट्यसंगीत

अजि मी ब्रह्म पाहिले

अजि मी ब्रह्म पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली
अमृतराय ह्मणे ऐसी माउली, संकटा वारिले

गीत – संत अमृतराय महाराज

संगीत – श्रीनिवास खळे

स्वर- आशा भोसले

राग – जयजयवंती

गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल

अजि आले गृहस्थचि माझे प्रियकर

अजि आले गृहस्थचि माझे
प्रियकर दूर देशीचे राजे

शमला अगं संताप पाहुनी
मीलन सूख ते घेता मिळुनी
अधरावरती आनंदाचे मंगल गीत विराजे

घनगर्जित ऐकुनी बावरी
उन्मन होउनी मत्त मयुरी
नाचे थय थय उन्मादाने, रुणुझुणु पैंजण वाजे

भेटताच सखि प्राण जीवना
पळात विझल्या सकल वेदना
अश्रूंची जाहली फुले ग, दु:ख मनोमनी लाजे

चंद्र पाहता फुले कमलिनी
तशीच मीही गेले फुलुनी
दलादलावर स्पर्श उमटला, मला मिळाले माझे

हरि कैवारी भक्तजनांचा
रहिवासी तो सकल मनांचा
मीरा विरहिणी मुक्त जाहली, द्वैत गळाले माझे

गीत –

संगीत – प्रभाकर जोग

स्वर- सुधा मलहोत्रा

गीत प्रकार – हे श्यामसुंदर

अजन्मा जन्मासी आला

अजन्मा जन्मासी आला
कारागारी अंधकारी कृष्णजन्म झाला

देवदुर्लभा सती देवकी
तिच्या तनूची करून पालखी
अनंत आले मानवलोकी
प्रसव-व्यथेवीण उरी होता तो, उदरी अवतरला

‘सोहं सोहं’ नाद उमटता
वळुनी कवळी देवकीमाता
फुटला पान्हा, बघता तान्हा
तुटे शृंखला बंधनातुनी, मोक्ष करी आला

बाहेरून तो गर्जे वारा
नाचू लागल्या श्रावणधारा
भिजली दारे, भिजल्या कारा
झडली कुलुपे कड्या उघडल्या, बंदिवास सरला

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सी. रामचंद्र

स्वर- फैयाज

गीत प्रकार – हे श्यामसुंदर

  टीप – • ग. दि. माडगूळकर रचित ‘गीतगोपाल’ मधून.

अजब सोहळा ! अजब सोहळा !

अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा !

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा !

किती काळ साहील?
किती मूक राहील?
वादळली माती करी वार्‍याचा हिंदोळा !

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे आता बघ उघडून डोळा !

गीत – शान्‍ता शेळके

संगीत – भास्कर चंदावरकर

स्वर- रवींद्र साठे

चित्रपट – गारंबीचा बापू

गीत प्रकार – चित्रगीत

अग्‍निमीळे पुरोहितं यज्ञस्य दे

अग्‍निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवामृत्विजम् ।
होतारं रत्‍नधातमम् ॥

कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणार्‍या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निबीड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा

तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्‍निहोत्री
अग्‍निहोत्र अग्‍निहोत्र

गीत – श्रीरंग गोडबोले

संगीत – राहुल रानडे

स्वर- राहुल रानडे

गीत प्रकार – मालिका गीते

  टीप – • शीर्षक गीत, मालिका- अग्‍निहोत्र, वाहिनी- स्टार प्रवाह.

अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम्‌ ढुम्‌ ढुम्‌
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

गीत – संदीप खरे

संगीत – सलील कुलकर्णी

स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे

अल्बम – अग्गोबाई ढग्गोबाई

गीत प्रकार – बालगीत, ऋतू बरवा, नयनांच्या कोंदणी

अगदिंच तूं वेडी ।

अगदिंच तूं वेडी ।
वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥

बघसि न दूरवरी ।
स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल, बोधाचे वैरी ॥

म्हणसी मी शहाणी,
सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥

गीत – गो. ब. देवल

संगीत – गो. ब. देवल

स्वर-

नाटक – संगीत शारदा

गीत प्रकार – नाट्यसंगीत

  

अगा वैकुंठींच्या राया ।

अगा वैकुंठींच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिकवरदा ।
अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आतां ॥४॥

गीत – संत कान्होपात्रा

संगीत – मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन

स्वर- पं. राम मराठे

नाटक – संत कान्होपात्रा

राग – भैरवी

ताल-केरवा

गीत प्रकार – नाट्यसंगीत, संतवाणी, विठ्ठल विठ्ठल