झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात?
नेसला मळिण चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात !
मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
‘दामाजीनं विकली जी कोठी-
त्याचं घ्यावं दाम पदरात !’
खळखळा ओतिल्या मोहरा
‘घ्या जी मोजून, पावती करा’
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात !
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट – पुढचं पाऊल (१९५०)
राग – काफी
गीत प्रकार – चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल