चला जाउ द्या पुढे काफिला अजुनी

चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू !

जाता जाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू !

थोडी हिरवळ, थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी, विसरा थकवा
सुखास पळभर चुंबू
इथेच टाका तंबू !

अंग शहारे जशी खंजिरी
चांदही हलला, हलल्या खजुरी
हलल्या तारा हलला वारा
नृत्य लागले रंगू
इथेच टाका तंबू !

निवल्या वाळूवरी सावली
मदमस्तानी नाचु लागली
लयीत डुलती थकली शरिरे
नयन लागले झिंगू
इथेच टाका तंबू !

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – पु. ल. देशपांडे

स्वर- आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे

चित्रपट – गुळाचा गणपति

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत