तव नयनाचें दल हललें ग !

तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढांसळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातुन शब्द निघाले,
“आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !”

हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरलें ग !

गीत – बा. भ. बोरकर

संगीत – सलील कुलकर्णी

स्वर- सलील कुलकर्णी

अल्बम – संधीप्रकाशात

गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी

  टीप – • काव्य रचना- २८ नोव्हेंबर १९४७.