दादा रुसला ताई रुसली, रुसली आज

दादा रुसला ताई रुसली, रुसली आज आई
काय करावे काही कळेना, बाई

म्हणती सारे आज मला, भली खोड की जिरली
शाळा सुटता धावत येता, स्वारी घसरून पडली
आई म्हणते, मला आजला कसली आहे घाई?

घाई कसली समजत नाही? लगीन बाहुलीचे !
आईलाही कसे कळेना मन हे आईचे !
माझी छकुली नवरी झाली, आज सासरी जाई

हसती सारे मोठ्याने पण डोळा माझ्या पाणी
नवरदेव हा किती धिटुकला, घेऊन जाई राणी
कशी कळेना घडली बाई घाईत ही नवलाई

गीत – प्रवीण दवणे

संगीत – नंदू होनप

स्वर- देवकी पंडित

गीत प्रकार – बालगीत