वळणवाटातल्या झाडीत हिर्वे छंद

वळणवाटातल्या झाडीत हिर्वे छंद
वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध

अशीच बांधलेली जन्माची नातीगोती
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती
मातीचा गंध ओला दरवळ रानभरी
पिकात वेचताना पाऊस-ओल्या पोरी

तुरीच्या हारी गच्च गर्भार ओटीपोटी
ज्वारीच्या ताटव्याशी बोलती कानगोष्टी
डाळिंबी लालेलाल रानाला डोळे मोडी
मेंदीच्या पावलांशी लागट लाडीगोडी

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येतं मन
आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं
पक्षांच्या पंखांवर माहेरी रोज यावं

गीत – ना. धों. महानोर

संगीत – आनंद मोडक

स्वर- जयश्री शिवराम, रवींद्र साठे

चित्रपट – मुक्ता

गीत प्रकार – चित्रगीत