नकोस नयनी भरू आसवे देऊ नको हुंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके
तुझ्या पाउली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
घरकुल आमुचे प्रसन्नतेने होईल ग बोलके
इथे अंगणी किती नाचतील
तुझ्या स्मितासम सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातुन येतिल या सदनी माणिके
नको बावरू मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणांची गंगा आम्हा पाहू दे कौतुके
गीत – शांताराम नांदगांवकर
संगीत – प्रभाकर जोग
स्वर- माणिक वर्मा
गीत प्रकार – भावगीत, नयनांच्या कोंदणी