अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे

अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे
मंदिरांत कां ग सखे सोडिसी उसासे

कुस्करुनी टकिलीस माळ ही कळ्यांची
चालविली उघडझांप नेत्रपाकळ्यांची
मोकळाच केशपाश, वसन तुझें साधें
कां धरिसी हरिवरती मधुरुसवा राधे?

कंसदमन करण्या हरि मथुरेला गेला
येइल परतूनि खचित घेउनि जयमाला
रथ दारीं राहि उभा, कोण गे तयांत
आण गडे पंचारति, आले यदुनाथ

प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचें
अंबरांत नाजुकशी चंद्रकोर हांसे.

गीत – संजीवनी मराठे

संगीत – यशवंत देव

स्वर- मधुबाला जव्हेरी

गीत प्रकार – शब्दशारदेचे चांदणे, भावगीत, हे श्यामसुंदर