थंड ही हवा, धुंद गारवा हा पाऊस

थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस रिमझिम बरसे !

रेशिमधारा या रुणझुणती
जलथेंबांचे उधळित मोती
पानफुले नाचती, गंधफुले भोवती
झुलती जलांचे आरसे !

काजळकाळ्या या आकाशी
वीज रेखिते सुंदर नक्षी
वारा खुळा होउनी, नाचे कसा अंगणी
गाणे खुषीचे गातसे !

हिरवी शेते हिरवी राने
फुलली भवती हिरवी कवने
नटली बघा ही धरा, झोक तिचा साजिरा
नवरी नवेली ही दिसे !

गीत – वंदना विटणकर

संगीत – डी. एस्‌. रुबेन

स्वर- पुष्पा पागधरे

गीत प्रकार – भावगीत, ऋतू बरवा