मानवतेचे मंदिर माझे

मानवतेचे मंदिर माझे, आंत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती !

बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी?
देव ते अंतरात नांदती !

आम्ही लाडके विठूरायाचे, लेणे जरीही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे
मृदुंगी वेदनेस विस्मृती !

दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हा साकडे
पथिक हे परंपरा सांगती !

गीत – रवीन्‍द्र भट

संगीत – सुधीर फडके

स्वर- सुधीर फडके

चित्रपट – ते माझे घर

गीत प्रकार – चित्रगीत

  टीप – • काव्य रचना- १९६१