घन तमीं शुक्र बघ राज्य करी, रे

घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडें फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं,
कां गुदमरशी आंतच कुढुनी?
रे ! मार भरारी जरा वरी.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेल जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?

मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं.

गीत – भा. रा. तांबे

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर- लता मंगेशकर

गीत प्रकार – भावगीत

  टीप – • काव्य रचना- २९ ऑक्‍टोबर १९२०, इंदूर• साक्षात्काराचा हा प्रथम किरण आहे. नैराश्य, खिन्‍नता, भीती ही ज्याचीत्याची स्वत:ची निर्मिती. विश्वाच्या सत्य स्वरूपात त्यास अवकाश नाही.