गडद निळे गडद निळे जलद भरुनि

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

क्षितिजीं आलें भरतें ग
घनांत कुंकुंम खिरतें ग
झालें अंबर
झुलतें झुंबर
हवेंत अत्तर तरतें ग

लाजण झाली धरती ग
साजण कांठावरतीं ग
उन्हांत पान
मनांत गान
ओलावुन थरथरतें ग

नातें अपुलें न्हातें ग
हो‍उनि ऋतुरस गातें ग
तृणांत मोती
जळांत ज्योती
लावित आलें परतें ग.

सरिंवर सरी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग.

गीत – बा. भ. बोरकर

संगीत – श्रीधर फडके

स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर

गीत प्रकार – ऋतू बरवा, भावगीत

  टीप – • काव्य रचना- ४ ऑक्‍टोबर १९५९.