जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे – नामंजूर !
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे – नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे – नामंजूर !

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा !
वेळ पाहुनी खेळ मांडणे – नामंजूर !

माझ्या हाती विनाश माझा ! कारण मी !
मोहासाठी देह ठेवतो तारण मी !
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे – नामंजूर !

रुसवेफुगवे भांडणतंटे लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे – नामंजूर !

मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन्‌ उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती-तत्त्वे फसवी गणिते ! दूर बरी !
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी !
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे – नामंजूर !

गीत – संदीप खरे

संगीत – संदीप खरे

स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे

अल्बम – नामंजूर

गीत प्रकार – कविता