अगा करुणाकरा करितसें धांवा

अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हेंचि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥

तुका ह्मणे आतां करीं कृपा दान ।
पाउलें समान दावीं डोळां ॥६॥

गीत – संत तुकाराम

संगीत – श्रीनिवास खळे

स्वर- लता मंगेशकर

राग – तोडी

गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल