सामर्थ्याहुन समर्थ निष्ठा

सामर्थ्याहुन समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय?
पडे अहल्या शिळा, त्या स्थळी येतिल प्रभुचे पाय !

कधी मी पाहिन ती पाऊले?

पाहिन केव्हा तो सोहळा
प्रभुचरणांचा स्पर्श कपाळा
आनंदाश्रू झरतिल डोळा
भाग्यच माझे दिसेल मजसी मूर्त उभे ठाकले !

रणांत जिंकुन कौरवसेना
यशसिद्धीच्या करित गर्जना
अभये अर्पित साधुसज्जना
पाच प्राणसे येतिल पांडव विजयाने न्हाले !

मारून रावण कपटी कामी
अशोकवनी या येतील स्वामी
वाहणार हे पदी प्राण मी
भेटीसाठी अशा अलौकिक कालचक्र थांबले !

देवाहुनही समर्थ भक्ती
स्वरांत माझ्या अमोघ शक्ती
सुफलित व्हाया माझी उक्ती
पंचकन्यका अर्पण करिती पुण्य मला आपले

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- आशा भोसले

चित्रपट – सुवासिनी

गीत प्रकार – चित्रगीत