डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाळ्यांत मासोळी गावायची नाय !
सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
कसंबी झोक
गळाचं टोक
जिव्हारी माझ्या भिडायचं नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाळ्यांत मासोळी गावायची नाय !
रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी शेपटीचं मारीन वल्हं
निळीनिळी लाट
पाण्यातली वाट
माझ्याबिगर तुला ठावीच नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा देईन मी दडी
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
मंतर असला चालायचा नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
गीत – शान्ता शेळके
संगीत – भास्कर चंदावरकर
स्वर- उषा मंगेशकर
चित्रपट – सर्वसाक्षी
गीत प्रकार – चित्रगीत, नयनांच्या कोंदणी