छळतसे काजळ काळी रात

छळतसे काजळ काळी रात
नभी चंद्रमा धवल पौर्णिमा तरीही मी तिमिरात

सूर जुळविले जिथे अंगणी
मधूर छेडिली एक रागिणी
अबोल झाली सतार का रे, आज तुझ्या विरहात
छळतसे काजळकाळी रात

प्राणांची तू घालुनी फुंकर
प्रीतिचा फुलविलास अंकुर
अमृतात ही न्हाली लतिका, कोमेजली निमिषात
छळतसे काजळकाळी रात

नको चांदणे, नको गंध हा
आर्त स्वरांचा नको छंद हा
एक स्मृती तव त्या स्पर्शांची, अमर असो हृदयात
माजू दे काजळकाळी रात

गीत – पुरुषोत्तम दारव्हेकर

संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर- कुमुद कामेरकर

नाटक – नयन तुझे जादुगार

गीत प्रकार – शब्दशारदेचे चांदणे, नाट्यसंगीत