फुलव पिसारा मोरा, श्रावण येतो आहे !
उंच स्वराने वारा ‘स्वागत’ गातो आहे !
तू धरणीचा मानसभाव
सहजनृत्य हा तुझा स्वभाव
आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे !
थेंब कशाचे? जलवर्षाव
तृप्तीमाजी बुडेल गाव
वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे !
लवते वेली, हलते झाड
विजयाआधी धुंद कवाड
संघनृत्यी या उडते माती, गुलाल होतो आहे !
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट – माझं घर माझी माणसं
गीत प्रकार – चित्रगीत, ऋतू बरवा