वळती वाट, चढता घाट तोल सावरा अ

वळती वाट, चढता घाट
तोल सावरा अंगाचा
वसंत आला वनात बाई उत्सव चाले रंगांचा !

बाई जपून जा गडे जपून जा
जपून जा बाई जपून जा !

हा चैत्र प्रीतिचा महिना
तरुतरूंत गाती मैना
खगाखगांचा सूर लागतो आज वेगळ्या ढंगाचा !

वनलतांत घुमती वाळे
त्या तिथेच मन्मथ खेळे
तळ्यात फुलल्या कमळांभवती संघ गुणगुणे भृंगांचा !

भिरभिरून वारा येतो
अन्‌ पदरा उडवून देतो
वातावरणी थवा तरंगे सप्तरंगी त्या मेघांचा !

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – सुधीर फडके

स्वर- आशा भोसले

चित्रपट – उमज पडेल तर

गीत प्रकार – चित्रगीत