वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा !
करिं करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगूर
देह नव्हे हा मोरपिसारा !
कसले कलियुग?- मी द्वापारी
गोपवधू मी, तू कंसारी
कालिंदीचा रम्य किनारा
गोपीनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले, आले मी अभिसारा !
मिठीत मिटले विश्व मुकुंदा
मी आपणिले ब्रह्मानंदा
तू मी दोघे- अमृतधारा !
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – पुरुषोत्तम सोळांकुरकर
स्वराविष्कार- ∙ माणिक वर्मा∙ आशा भोसले( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट – ऊन पाऊस
गीत प्रकार – हे श्यामसुंदर, भावगीत, चित्रगीत
टीप – • स्वर- माणिक वर्मा, संगीत- पुरुषोत्तम सोळांकुरकर.• स्वर- आशा भोसले, संगीत- सुधीर फडके, चित्रपट- पोस्टातली मुलगी.