मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवण

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्‍नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !

गीत – सुरेश भट

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वराविष्कार- ∙ लता मंगेशकर∙ श्रीकांत पारगांवकर( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )

अल्बम – मैत्र जीवाचे

गीत प्रकार – भावगीत

  टीप – • स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.• स्वर- श्रीकांत पारगांवकर, संगीत- सुधीर मोघे.• श्रीकांत पारगांवकर यांच्या स्वराविष्कारातील सुरुवातीची कविता- ‘पायपीट’दु:खाच्या वाटेवरगाव तुझे लागले;थबकले न पाय तरीहृदय मात्र थांबले !वेशीपाशी उदास हाक तुझी भेटलीअन्‌ माझी पायपीटडोळ्यांतुन सांडली.