लखलख चांदणं कोजागरीचं

लखलख चांदणं कोजागरीचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

चंदेरी फुलांच्या गोफुन माळा
चल ये सजणे घाल माझ्या गळा
झिमझिम शिंपीत प्रीतिचं चांदणं
जोडीनं गोडीनं फिरायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

कुणी नाही इथं हिरव्या रानात
गुलाबी गुपीत सांग माझ्या कानात
खसखस पिकली पिंपळ पानात
खुदकन मनात हसायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

तेजाचा पाऊस भुईवर पडतोय
प्रीतिचा पारवा नभात उडतोय
फेर धरी चांदवा नाचते पुनवा
रंगात ढंगात नाचायचं
टपोरं डोळ्यांनी बघायचं रं,
रातभर सजणा जागायचं रं !

गीत – पी. सावळाराम

संगीत – स्‍नेहल भाटकर

स्वर- आशा भोसले, दशरथ पुजारी

चित्रपट – मानला तर देव

गीत प्रकार – चित्रगीत, युगुलगीत, शब्दशारदेचे चांदणे, नयनांच्या कोंदणी